Crime : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावातून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत विषण्ण करणारी घटना समोर आली आहे. घरासमोर खेळणाऱ्या एका अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर गावातीलच एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबावर ओढवलेले संकट नसून, समाजातील ढासळत्या नैतिकतेचे भयावह चित्र मांडणारी आहे.

कान्हूर मेसाई येथील ही आठ वर्षांची चिमुरडी नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होती. दुपारच्या वेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून गावातील एका ओळखीच्या अल्पवयीन मुलाने घरात प्रवेश केला. या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर त्याने तिला कोणालाही न सांगण्याची धमकी दिली आणि पसार झाला. सायंकाळी मुलीला अचानक ताप आल्याने आणि तिची प्रकृती खालावल्याने घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांना या अमानुष कृत्याचा सुगावा लागला आणि त्यांनी पालकांना कल्पना दिली. पीडित मुलीनेही विश्वासात घेतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार सांगितला.
या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात आणि शहरात महिला व लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. कात्रजमधील मांगडेवाडीत एका महिलेचा खून करून मृतदेह खाणीत फेकल्याची घटना ताजी असतानाच, आता एका चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. या घटनांमुळे ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.







