अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील तहसील कार्यालय (Ahilyanagar News) परिसरात कृषी विभाग आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खताने (Kopargaon News) भरलेला ट्रक जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांत झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने खत माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (17 फेब्रुवारी) रात्री साडेआठच्या सुमारास कृषी विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, MH 20 DE 0999 क्रमांकाचा ट्रक संवत्सरा परिसरातून वैजापूरच्या दिशेने जात असून त्यामध्ये बनावट खताची वाहतूक होत आहे. माहितीची खातरजमा होताच कृषी विभागाचे निरीक्षक गणेश बिरवाडे आणि शहर पोलिसांनी तातडीने सापळा रचला. तहसील कार्यालय परिसरात ट्रक अडवून झडती घेतली असता त्यामध्ये 477 पोत्यांमध्ये भरलेले रासायनिक खत आढळून आले.
चौकशीदरम्यान ट्रक चालक भुजंग नामदेव केवार (रा. बौद) याच्याकडे संबंधित खताबाबत कोणतीही वैध बिले, परवाने किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा साठा बेकायदेशीर असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. जप्त केलेल्या खताचे एकूण वजन सुमारे 24 टन असून त्याची अंदाजे किंमत 6 लाख 24 हजार 240 रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह संबंधित चार कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 316(4) तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, उपनिरीक्षक संदीप सोझे आणि दिव्या थेटे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
जप्त केलेला ट्रक पुढील तपासासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात हलवून सील करण्यात आला आहे. एपीएमसीच्या प्राथमिक तपासणीत संबंधित खत खते (नियंत्रण) आदेश 1965 तसेच उत्पादन शुल्क कायदा 1966 मधील निकषांची पूर्तता करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या घटनेनंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. खत खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, बिल आणि पावत्या जतन कराव्यात तसेच संशयास्पद साठा किंवा वाहतूक आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बनावट खतामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.







