उरुळी कांचन : पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ ते बिवरी – अष्टापूर गावादरम्यान असलेला कोरेगाव मूळ हद्दीतील मुळा मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून अपघाताला निमंत्रण देत आहे. एखादा अपघात घडल्यास प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न येथून प्रवास करणारे पूर्व हवेलीतील ग्रामस्थ विचारत आहेत. तसेच पाण्याच्या अति दाबाने हा बंधारा वाहून जाण्याची भीती कोरेगाव मुळ, बिवरी व अष्टापूर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पूर्व हवेलीतील अनेक गावांना जोडणारा व ग्रामीण भागातील महत्त्वाचा असणाऱ्या नदीवरील पुलाची उंची कमी आहे. परिणामी, जास्त पाऊस झाला, की या पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता काहीकाळ बंद असतो. त्यामुळे अनेक गावांमधील नागरिकांना फेऱ्याने प्रवास करावा लागतो. त्यातच पावसाने झालेल्या पुराच्या पाण्याने या पुलाची दुरवस्था झाली आहे. दोन्ही बाजुनी पुलाचा अनेक भाग हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला आहे. मागील अनेक वर्षे नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याचा मार खाऊन हा पूल कमकुवत बनला आहे. भविष्यात हा पूल कधीही पुराच्या पाण्यात वाहून जाऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पुलाच्या कडेला मोठं मोठ्या दऱ्या निर्माण झाल्या असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बिवरी, अष्टापूर, वाडेबोल्हाई, डोंगरगाव या ठिकाणावरून नगर रस्त्याला जाणाऱ्या व येणाऱ्या चारचाकी, दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या वाहून गेलेल्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे मोठे परिणाम या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना भोगावे लागणार आहेत.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उंची असलेला नवीन पूल मंजूर करून बांधून द्यावा, अशी मागणी कोरेगाव मूळ, अष्टापूर, बिवरी व वाडेबोल्हाई, तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. मुळा -मुठा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून कधीही कोसळून पडू शकतो, अशी अवस्था या पुलाची झाली आहे. एखादा मोठा अपघात होण्याआधी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन येथे नवीन पूल बांधावा.
याबाबत बोलताना कोरेगाव मूळचे माजी सरपंच मंगेश कानकाटे म्हणाले, “या पुलासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संबंधित विभाग हा वेळकाढूपणा करीत आहे. मुळातच बंधाऱ्याची ताकद कमी झाल्याने पावसाळ्यात नक्कीच मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता असून प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे.
याबाबत बोलताना पुरंदर उपसा जलसिंचन उपविभाग पुरंदरचे शाखा अभियंता प्रकाश धुमाळ म्हणाले, “कोरेगाव मूळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील रस्ता खड्डे युक्त झाला आहे, स्लॅब मधील लोखंड ठिकठिकाणी उघडे पडले आहे हे वास्तव आहे. ते दुरुस्त करण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर या बंधाऱ्यावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल.”







