पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. याच चर्चांदरम्यान, पुण्यात खास बॅनर झळकले आहेत. पुण्यात एकाच बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पाहायला मिळत आहेत. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

पुण्यातील या बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १२ जून तर राज ठाकरेंचा वाढदिवस १४ जून रोजी असून, या बॅनरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. युतीबाबतच्या नव्या अटकळींमध्ये, उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रातील जनतेला जे हवे आहे ते होईल.’ असे म्हंटले आहे.

दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि मनसेच्या निराशाजनक कामगिरीमुळे, दोन्ही पक्षांमधील युतीबद्दल चर्चा सुरु आहे. २०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फक्त २० जागाच मिळवता आल्या तर मनसेला खातेही उघडता आले नव्हते.








