पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य (Ajit Pawar) संस्थांच्या निवडणुका दोन्ही (Local Bodies Election) राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, ही चर्चा राजकीय (Sharad Pawar) वर्तुळामध्ये सुरू असतानाच अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता त्यानंतर राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे, कारण “मला प्रस्ताव आला असल्याचा आणि त्यावर दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचा” दुजोरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

बारामतीमध्ये बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, “आता झालं गेलं गंगेला मिळालं, माझंही साहेबांवर प्रेम आहे,” असं सांगत हा निर्णय सकारात्मक असणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं, असलं काहीही तुम्ही मला सांगू नका. शेवटी सगळे मतदार हे आपलेच आहेत,” असं म्हणत आगामी वाटचालीची दिशा अजित पवार यांनी स्पष्ट केली. मेळाव्यात बोलताना एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना चिठ्ठी आणून दिली होती. यामध्ये लोकसभा निवडणुकीबाबत काहीतरी नमूद केलेलं होतं. या चिठ्ठीवर व्यक्त होताना अजित पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर अधिक भर दिला.
“मी काही वेगळी राजकीय भूमिका घेतो म्हणून माझं साहेबांवर प्रेम नाही, असा अर्थ होत नाही. असा विचार करणं म्हणजे तुमच्या बुद्धीचा छोटेपणा आहे,” असं अजित पवार पुढे म्हणाले. “एका बाजूला आदरणीय पवार साहेब आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार, त्यामुळे प्रश्न निर्माण होणारच. काहींचं प्रेम साहेबांवर का नसावं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत. मी काय वरून पडलो होतो का? हे मला कसं विसरता येईल? तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. बारामतीकरांनी विधानसभेला मला लाखोंचं मताधिक्य दिलं ना? अरे, जरा दिलदारपणा वाढवा, मनाचा मोठेपणा वाढवा. आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना,” असं सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाही बेरजेचं राजकारण करण्याचा संदेश या निमित्ताने दिला.






