Accident : पुणे–नाशिक महामार्गावर रविवारी रात्री घडलेला भीषण अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर घेऊन आला आहे. मंचरजवळ खासगी बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत एका कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. काही सेकंदात एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणारी ही घटना परिसरात हळहळ निर्माण करून गेली.

प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील मल्लिकार्जुन आंबेगावे हे कुटुंबासह नाशिक येथे कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात मंचर परिसरात कारवरील ताबा सुटला आणि वाहन दुभाजक ओलांडून विरुद्ध लेनमध्ये घुसले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या खासगी बसला कारची जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार अक्षरशः चुराडा होऊन बसच्या खाली अडकली.

या अपघातात मल्लिकार्जुन आंबेगावे, त्यांची पत्नी आणि आई यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, नियतीने दोन चिमुकल्यांना वाचवले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसमधील काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली.







