लोणी काळभोर, ता. 17 : धुलीवंदन खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी कॅनॉलमध्ये गेलेला तरुण पाण्यात बुडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील गंगानगर परिसरात शुक्रवारी (ता.14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. अखेर दोन दिवसानंतर त्या वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रुपनर वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलमध्ये रविवारी (ता. 16) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळला आहे.

विवेक रेवतीरम मौर्य (वय-21, सद्या, रा. गंगानगर, हडपसर, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रघुवीर रामजतन चौव्हाण (वय-28) यांनी बेपत्ता झाल्याची माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर चौव्हाण यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. तर त्यांच्याकडे विवेक हा काम करीत होता. चौव्हाण यांनी होळी व धुलीवंदन या सणानिमित्त 14 आणि 15 मार्च या दोन दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली होती. दरम्यान, शुक्रवारी सर्व जण रंग खेळेले व कॅनॉलमध्ये पोहून रंग धुण्यासाठी दुपारच्या सुमारास गेले होते. कॅनॉलमध्ये पोहताना विवेक हा बुडून वाहून गेला होता. त्यानंतर फुरसुंगी पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी विवेकला खूप शोधण्याचा प्रयत्न केला मात्र विवेक आढळून आला नाही.
दरम्यान, काही नागरिकांना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रुपनर वस्ती परिसरात असलेल्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये एक तरुण आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विवेकला कॅनॉलमधून बाहेर काढले.
त्यानंतर पोलिसांनी मृत विवेकला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विवेकचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राणी खामकर करत आहेत.







