इम्रान अत्तार

भोर, ता. 27 जुलै: पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशन आणि वनविभाग भोर यांच्या संयुक्त प्रयत्नातून मौजे खानापूर (ता. भोर) येथे विहिरीत पडलेल्या मोराचे प्राण वाचवण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी घडली.
शेतकरी जयवंत थोपटे हे सकाळी आपल्या शेतातील विहिरीकडे गेले असता त्यांना विहिरीत एक मोर पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ वनविभाग भोर यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत आणि वनपाल सुग्रीव मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के. एम. हिमोणे व श्रीमती पूनम माने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सर्पमित्र अनिरुद्ध बर्वे, समीर कदम, अविनाश चव्हाण आणि किरण बरदाडे यांनी विहिरीत उतरून दोरखंडाच्या सहाय्याने पाण्यात अडकलेल्या मोराला सुखरूप बाहेर काढले.

अनिरुद्ध बर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशन गेली २५ वर्षे संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्रात निसर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नव्हती. मात्र विद्यमान मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलेली सर्पमित्र विमा व ओळखपत्र योजना लवकरात लवकर अमलात यावी, ही सर्पमित्रांची मागणी आहे.”
“प्रशासन मदत करेल किंवा नाही, पण आम्ही निसर्ग वाचवण्यासाठी आमचे काम करतच राहू,” अशी प्रतिक्रिया बर्वे यांनी दिली.
या तात्काळ आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे एक मौल्यवान पक्षी वाचवण्यात वनविभाग आणि सर्पमित्र यशस्वी ठरले.







