उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील हापूड (Viral News) जिल्ह्यात एक धक्कादायक आणि गोंधळ (UP News) उडवणारी घटना उघडकीस आली आहे. गढमुक्तेश्वर परिसरातील ब्रजघाट स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी सुमारे अनोखा प्रकार घडला. दोन तरुण एका कारमधून चादरीत गुंडाळलेला मृतदेह असल्याचा दावा करत स्मशानात आले. त्यांनी तातडीने चितेसाठी तयारी सुरु केली आणि भटजींना विधी करण्याची विनंती केली. सर्व काही घाईघाईने सुरू असल्याने तिथे उपस्थितांना सुरुवातीला काहीच संशय आला नाही. (Breaking News)

पारंपरिक विधीनुसार भटजींनी चेहरा दाखवण्यास सांगितले. मात्र तेव्हा दोन्ही तरुण टाळाटाळ करू लागले. त्याचवेळी तिथे असलेल्या एका व्यक्तीला मृतदेहाचा आकार आणि बांधणी काहीतरी वेगळी वाटली. त्याने धाडस करून चादर दूर केली असता आश्चर्याचा धक्का बसला. चितेवर ठेवलेला मृतदेह नसून प्लास्टिकचा पुतळा असल्याचे समोर आले. ही गोष्ट कळताच स्मशानभूमीत उपस्थित सर्वांमध्ये गोंधळ उडाला. दोन्ही तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले.
भटजींनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच गढमुक्तेश्वर पोलीस घटनास्थळी आले आणि दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कार, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या विचित्र प्रकाराबाबत परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. काहींच्या मते जीवन विम्याचा पैसा मिळवण्यासाठी बनावट मृत्यूचे नाटक रचण्यात आले असावे. काहींनी हे एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आखलेला कट असू शकतो, असे मत व्यक्त केले. तर काहींनी तंत्रमंत्र किंवा जादूटोण्याशी संबंधित प्रकार असावा अशी अटकळ बांधली.
पोलिसांनी सांगितले की दोघांची चौकशी सुरू आहे. प्लास्टिकचा पुतळा कुठून आणला आणि यामागचा खरा हेतू काय होता याचा शोध घेतला जात आहे. सर्व शक्यता तपासल्या जात आहेत आणि सध्या कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.







