Viral News: बिहार: बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात यश मिळाल्याचा खोटा दावा करून एका तरुणाने संपूर्ण प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना गंडवल्याचे उघड झाले आहे. रणजीत कुमार असे या तरुणाचे नाव असून त्याने आपण देशात 440 वी रँक मिळवली असल्याचे सांगितले होते. त्याच्या या दाव्यावर विश्वास ठेवून स्थानिक राजद आमदारांनी त्याला सुटकेस आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली. इतकेच नाही तर शेखपुरा पोलिसांनीही कोणतीही खातरजमा न करता या तरुणाचा जाहीर सत्कार केला.

रणजीत कुमार हा फतेहपूर गावचा रहिवासी असून त्याचे वडील अर्जुन यादव हे शेतकरी आहेत. युपीएससीत यश मिळाल्याची बातमी पसरल्यानंतर रणजीतचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. अनेक ठिकाणी त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले, जिथे तो युवकांना प्रेरणादायी भाषणे देत असे. त्याच्या या भाषणांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र सोमवारी संध्याकाळी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश झाला. काही सजग नागरिकांनी युपीएससीची अधिकृत गुणवत्ता यादी तपासली असता, 440 व्या क्रमांकावर प्रत्यक्षात कर्नाटक राज्यातील एका रणजित नावाच्या उमेदवाराचे नाव असल्याचे दिसून आले.
केवळ नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेऊन शेखपुराच्या रणजीतने ही फसवणूक केली होती. ही माहिती गावात पसरताच रणजीतने आपला मोबाईल बंद केला आणि तिथून पळ काढला. विशेष म्हणजे ज्यांनी मोठ्या उत्साहात त्याचा सत्कार केला, तेच पोलीस आणि माजी आमदार आता त्याचा शोध घेत आहेत.
माजी आमदार विजय यादव आणि अनेक सामाजिक संस्थांनी त्याच्या स्वागतासाठी मोठा खर्च केला होता. जेव्हा महुली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याचे मूळ प्रवेशपत्र दाखवण्यास सांगितले, तेव्हा तो घाबरला आणि पळून गेला. पोलिसांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तांत्रिक माहितीच्या आधारे रणजीतचा शोध सुरू केला आहे. एका साध्या नावाच्या साधर्म्यामुळे जिल्हा प्रशासनाची कशी दिशाभूल झाली, याची आता संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.







