Rule Change by 1 March : दर महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक नियमांमध्ये बदल होत असतात आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्चावर दिसून येतो. 1 मार्च 2026 पासूनही काही महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅसचे दर, रेल्वे तिकीट बुकिंग, सिम वापराचे नियम, UPI व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यामध्ये बदल होऊ शकतात.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केल्या जातात. मागील काही महिन्यांत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरात चढ-उतार दिसून आला आहे. मागील महिन्यात सुमारे 49 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मार्चमध्येही दरात बदल होऊ शकतो. घरगुती सिलेंडरचे दर सध्या स्थिर आहेत.
रेल्वे तिकीट बुकिंगसंबंधीही नवीन नियम लागू होऊ शकतात. 1 मार्च 2026 पासून जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगसाठी जुना UTS अॅप बंद होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी RailOne नावाचे नवीन अॅप सुरू केले जाऊ शकते. या अॅपवरून स्थानिक प्रवास, जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट सहज बुक करता येणार आहे.
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सिम बाइंडिंगचा नवा नियम लागू करण्याची तयारी सुरू आहे. या नियमानुसार WhatsApp, Telegram आणि Signal यांसारखी अॅप्स थेट सिमशी जोडली जातील. सिम काढल्यास ही अॅप्स काम करणार नाहीत.
UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर अतिरिक्त सुरक्षा लागू केली जाऊ शकते. तसेच काही सरकारी बँका किमान शिल्लक नियमात बदल करून सरासरी मासिक शिल्लक या आधारावर दंड आकारण्याची शक्यता आहे. याशिवाय CNG, PNG आणि ATF दरातही बदल होऊ शकतो.
