Pune Crime : पुणे : संशयाचे जाळे जेव्हा रक्ताच्या नात्यात विणले जाते, तेव्हा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येतात. नाशिकमधील एका विवाहित महिलेला पुण्यात (Pune) अशाच एका विचित्र आणि मानवी कल्पनेपलीकडील छळाला सामोरे जावे लागले आहे. ‘तुझी मुलं वडिलांसारखी दिसत नाहीत‘ असा अजब दावा करत सासरच्या मंडळींनी या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.

केवळ मुलांच्या चेहऱ्यातील साम्य शोधत सासरच्यांनी तिचे जगणे असह्य केले आणि तिचा वारंवार मानसिक छळ केला. अखेर, या अमानवीय वागणुकीला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयाच्या या धुक्यामागील नेमके सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिताली आणि सुनील (नावे बदललेली) यांचा विवाह काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. सुनील एका खासगी कंपनीत नोकरी करत असून कुटुंब उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. त्यांच्या संसारात एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलं मोठी होत असताना त्यांचे चेहरे पतीसारखे दिसत नसल्याचे कारण देत घरात वाद सुरू झाले. सुनीलच्या बहिणीनेही यावरून शंका व्यक्त केली. हळूहळू सासू-सासऱ्यांनीही महिलेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले जाते.
DNA साठी स्वत: पुढाकार घेतला
याबाबत पतीशी संपर्क साधला असता त्यानेही साथ न देता उलट तिला दोष दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आपल्यावरचे आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी महिलेने स्वतःहून डीएनए चाचणी करण्याची तयारी दर्शवली. नातेवाईकांच्या उपस्थितीत पती आणि दोन्ही मुलांची डीएनए चाचणी करण्यात आली. अहवालात दोन्ही मुले पतीचीच असल्याचे स्पष्ट झाले. तरीही पतीने पत्नी आणि मुलांना स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पीडित महिलेने पती व सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी विविध कलमांनुसार कारवाई सुरू केली आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले असून सुनावणी सुरू आहे.




