मुंबई: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. २०१८ आणि २०२१ मध्ये जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे ही अटक करण्यात आली. भारतातून पळून गेलेल्या आणि पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममधील अँटवर्प येथे राहत असलेल्या चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) त्याच्या प्रत्यार्पणाचा पाठपुरावा करत होते आणि बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी अटकेत सहकार्य केले. बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला होता.
चोक्सीने पीएनबीमध्ये १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ अंतर्गत त्याला फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले. चोक्सीच्या अटकेमुळे त्याच्या भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) अपीलवरून चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली. तो अजूनही तुरुंगात असल्याची माहिती समोर आली आहे.
चोक्सी आरोग्यविषयक समस्या आणि इतर कारणांमुळे जामिनासाठी अर्ज करू शकतो. चोक्सीचा भाचा नीरव मोदी हा देखील पीएनबी घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी आहे.