इराण: अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष आता जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. या दोन देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम केवळ त्यांच्यापुरते मर्यादित न राहता, त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर पडसाद उमटू लागले आहेत. इराणने येमेनमधील हूती विद्रोह्यांना एका महत्त्वाच्या संदेशाद्वारे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अमेरिकेने इराणच्या तेल प्रकल्पांवर किंवा ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास, हूती विद्रोह्यांनी लाल समुद्रातील जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प करावी, असे इराणचे म्हणणे आहे.

जागतिक व्यापारासाठी ‘बाब-अल-मंदेब’ हा सागरी मार्ग अत्यंत मोलाचा आहे. वृत्तानुसार, या मार्गावर विद्रोह्यांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा साठा तैनात केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून संकेत मिळताच हूती विद्रोही या जलमार्गावर हल्ले करू शकतात. दररोज सुमारे 7.4 दशलक्ष बॅरल कच्चे तेल या मार्गाने प्रवास करते, जे जागतिक उत्पादनाच्या 7 टक्के आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारात तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड वाढ होऊ शकते.

या घडामोडी भारतासाठीही चिंतेचा विषय आहेत. भारत आपल्या इंधनाची मोठी गरज आखाती देश आणि रशियाकडून आयात करत असतो. रशियाकडून येणारे तेल याच मार्गावरून भारतीय बंदरांपर्यंत पोहोचते. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास भारताचा इंधन पुरवठा विस्कळीत होऊन देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, अमेरिकन फौजांनी इराणच्या लष्करी तळांना आणि हवाई संरक्षण केंद्रांना लक्ष्य केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही कुवेत, कतार, बहरीन आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर हल्ले चढवले आहेत. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय अस्थिरता आणि जागतिक सुरक्षा धोक्यात येण्यात होत आहे.






