पुणे :आंध्रप्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही तब्बल तीन वर्षानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.गेल्या काही दिवसांत कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून, विशेषतः पुणे शहरात याचे प्रमाण अधिक दिसत आहे. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 2026 या वर्षात महाराष्ट्रात आतापर्यंत 48 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र या कालावधीत राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

गेल्या 3 वर्षांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. मात्र, यंदाच्या वर्षात जानेवारीपासून रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आकडेवारीनुसार, जानेवारीत 3, फेब्रुवारीत 1, जूनमध्ये 11, तर जुलै महिन्यात आतापर्यंत 21 रुग्णांचे निदान झाले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रुग्ण नियमित तपासणीत समोर आलेले नाहीत. इतर आजारांवरील उपचारादरम्यान किंवा शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या अनिवार्य चाचण्यांमध्ये अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, सध्या पसरत असलेला हा संसर्ग ओमिक्रॉन विषाणूपेक्षाही सौम्य स्वरूपाचा आहे. रुग्णांमध्ये प्रामुख्याने खोकला, सर्दी, थकवा आणि घशात खवखव होणे अशी लक्षणे दिसत असून, ती 3 ते 5 दिवसांत बरी होत आहेत. 2023 नंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत अशी वाढ होत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांत कोरोनासोबतच फ्लू (इन्फ्लूएंझा) च्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.
दुसरीकडे, आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात (26 जून ते 16 जुलै दरम्यान) कोरोनाचे 12 रुग्ण आढळले असून, तिथल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत पावलेल्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब (High BP) आणि किडनीचे गंभीर आजार होते. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनाचा संसर्ग त्यांच्यासाठी घातक ठरला.
आता कोरोना हा नेहमीच्या फ्लू सारखाच राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि घाबरण्याऐवजी सतर्क राहावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.






