संभल: नात्याला (Crime News) काळिमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका महिलेने आपल्या 2 प्रियकरांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आणि पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. राहुल असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बूट विकण्याचे काम करत होता. १५ वर्षांपूर्वी त्याचे रुबीशी लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. १८ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री राहुलने पत्नीला प्रियकर गौरवसोबत रंगेहाथ पकडले होते, ज्यानंतर सुरू झालेल्या वादाचा शेवट या भीषण हत्याकांडात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने बदनामी करण्याची धमकी दिल्याने रुबी आणि गौरवने मिळून त्याच्या डोक्यावर हातोडा आणि लोखंडी रॉडने वार केले. पतीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी एका ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. शरीराचे काही भाग घरापासून जवळच असलेल्या नाल्यात फेकले, तर डोके गंगा नदीत फेकून दिले. कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी राहुलचे कपडेही जाळून टाकले. धक्कादायक म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी रुबीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
सुमारे २७ दिवसांनंतर पोलिसांना नाल्याजवळ एक कुजलेला मृतदेह सापडला. मृतदेहाच्या हातावर असलेल्या राहुल नावाच्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली. तपासादरम्यान पोलिसांना राहुलच्या घरात रक्ताचे काही डाग आढळले आणि शेजाऱ्यांकडून रुबीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. राहुलच्या लहान मुलीनेही घरात अनोळखी माणसे आल्याचे पोलिसांना सांगितले. संशयावरून रुबीची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. चांदौसी पोलिसांनी या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे.






