प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. याअंतर्गत १५ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (स्तर १, २ व ३) यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व संबंधित कार्यालयांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
निवडणूक कामकाजासाठी एकूण २२ कक्षांची स्थापना करण्यात आली असून, त्या अनुषंगाने १५ नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर देखील २२ कक्षांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांकडील ना-हरकत थकबाकी प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे यासाठी संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. उमेदवारांना एकाच ठिकाणी किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून प्रमाणपत्र मिळविता येणार आहे. तसेच प्रचारासाठी आवश्यक असलेले वाहन परवाना, तात्पुरते प्रचार कार्यालय, कोपरा सभा, जाहीर सभा आदी परवाने देण्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एक खिडकी कक्ष (वन विंडो सिस्टम) स्थापन करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी संगणक प्रणालीबाबतची कार्यवाही सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून सध्या १६० पोलिसांची नियुक्ती करण्यात येत असून, त्याबाबत पोलीस विभागास कळविण्यात आले आहे. (Pune News )

मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी १, २ व ३ यांच्या अनुषंगाने सुमारे २३ हजार कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. सर्व प्रभागांमध्ये स्ट्रॉंग रूम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्रांची ठिकाणे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत निश्चित करण्यात येत आहेत.
पुणे महानगरपालिकेतील ४१ प्रभागांमध्ये एकूण ४०१२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, अंतिम मतदार यादीच्या आधारे मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
एकूणच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.






