गया (बिहार): “राम नाम सत्य है…” या सुरात निघालेली अंत्ययात्रा, पुढे वाजत असलेला बँडबाजा, आणि फूलांनी सजवलेली तिरडी… दृश्य अगदी एखाद्या पारंपरिक अंत्यसंस्कारासारखेच होते. पण फरक इतकाच होता की, या तिरडीवर झोपलेला माणूस जिवंत होता! बिहारच्या(Bihar) गया जिल्ह्यातील गुरारू प्रखंडातील कोंची गावात ही विचित्र ( Bihar Shocking News)पण तितकीच भावनिक घटना घडली आहे. ७४ वर्षीय माजी वायुदल जवान मोहनलाल यांनी स्वतःच्या जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा काढली. बँडबाजाच्या सुरात ‘चल उड जा रे पंछी, अब देश हुआ बेगाना’ हे गाणं वाजत असताना मोहनलाल तिरडीवर झोपलेले होते आणि गावकरी त्यांच्यामागे ‘राम नाम सत्य है’ म्हणत चालत होते. संपूर्ण गावात एक गंभीर, विचार करायला लावणारे वातावरण निर्माण झाले होते.

मोहनलाल यांच्या या “जिवंत अंत्ययात्रे”त शेकडो गावकरी सहभागी झाले. मुक्तीधामावर पोहोचल्यावर ते तिरडीवरून उठले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पुतळ्याचा अग्निसंस्कार करण्यात आला. सर्व पारंपरिक विधी पार पाडले गेले. अगदी राख नदीत विसर्जित करणे आणि सामूहिक भोजनाची सोय करण्यापर्यंत सर्व विधी पूर्ण झाले.

पण अखेर सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता की, “असं का केलं?”

या प्रश्नाचं उत्तर मोहनलाल यांनी स्वतः दिलं. त्यांनी सांगितलं, “माणूस मेल्यानंतर त्याला काहीच दिसत नाही . कोण आलं, कोण नाही, कोणी खांदा दिला, मला हे सगळं पाहायचं होतं. मला जाणून घ्यायचं होतं की, माझ्या अंत्ययात्रेत किती जण सहभागी होतात जे माझ्यावर प्रेम करतात, मला सन्मान देतात.”
मोहनलाल यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक सामाजिक कार्य केले आहेत. पावसाळ्यात अंत्यसंस्काराला होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या खर्चाने गावात आधुनिक मुक्तीधाम बांधले. गावकऱ्यांच्या मते, त्यांचे काम संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून पत्नी जीवनज्योती यांचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले. पेन्शनमधून मिळणाऱ्या पैशांतूनच ते सर्व समाजोपयोगी कामे करतात. गावकऱ्यांसाठी त्यांचे समाजकार्य प्रेरणादायी आहे.







