सुरत: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुरतमधील एका कुटुंबाने त्यांच्या संग्रहातील एका रफ डायमंड विशेष दर्शनासाठी ठेवले. या हिऱ्यामध्ये भगवान गणेशाची आकृती नैसर्गिक स्वरूपात दिसत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. कनुभाई रामजीभाई यांच्या कुटुंबासाठी हा दगड केवळ मौल्यवान रत्न नसून श्रद्धेचा विषय आहे.

कुटुंबाच्या माहितीनुसार, 2002 च्या आसपास बेल्जियममधून मोठ्या प्रमाणात रफ डायमंड खरेदी करण्यात आले होते. हे दगड घरी आणल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका रफ डायमंडमध्ये गणेशासारखी आकृती दिसून आल्याचे कनुभाई यांनी सांगितले. या दगडावर गणेशाची आकृती तयार करण्यासाठी कोणतेही विशेष कटिंग किंवा प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याचेही कुटुंबाचे म्हणणे आहे.

हा रफ डायमंड 618.27 कॅरेटचा असल्याचे सांगितले जाते. त्याची किंमत 500 कोटी ते 1000 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे अंदाज व्यक्त केले जात असले, तरी कुटुंबीयांनी त्याची अधिकृत बाजारातील किंमत निश्चित केलेली नाही. कनुभाई यांच्या मते, त्यांच्या कुटुंबासाठी या रफ डायमंडचे आर्थिक मूल्य ठरवणे शक्य नाही.

या विशेष रफ डायमंड वर्षातून साधारणपणे एक किंवा दोन दिवसच दर्शनासाठी ठेवले जाते. यंदा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. इतर दिवस हा दगड सुरक्षितपणे लॉकरमध्ये ठेवला जातो.
17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तही कुटुंबाने विशेष आरती आणि प्रार्थना केली. मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाचा फोटो पंतप्रधानांना पाठवणार असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.






