उत्तर प्रदेश: माणुसकीला काळिमा फासणारी आणि नात्यातील विश्वासाला तडा देणारी एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या व्यसनासाठी किंवा पैशांच्या हव्यासापोटी एका पतीने आपल्याच पत्नीला अवघ्या 1,000 रुपयांसाठी मित्रांच्या हवाली केले. यानंतर त्या नराधम मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फैजगंज बेहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती ‘छट्टन’ याने केवळ 1,000 रुपयांच्या बदल्यात तिला आपल्या दोन मित्रांसोबत पाठवून दिले. आरोपी बालकिशन आणि पप्पू यांनी या महिलेला एका निर्जन स्थळी नीलगिरीच्या बागेत नेले आणि तिथे तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
पिडीत महिलेने या घटनेनंतर खचून न जाता हिंमत दाखवत पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून बालकिशन आणि पप्पू या दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. पत्नीचा सौदा करणारा नराधम पती छट्टन सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
पीडितेची वैद्यकीय तपासणी जिल्हा महिला रुग्णालयात करण्यात आली असून, पोलीस अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, नात्यातील या क्रूरतेने समाजमन सुन्न झाले आहे.






