मुंबई: मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेल्या जंगलात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी २१ वर्षीय सूरज मारुती वाघमारे या तरूणाला तातडीने अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण मुंबई परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलगी आणि आरोपी सूरज यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, मृत तरुणी इतर कोणाच्या तरी संपर्कात असल्याचा संशय सूरजला होता. या संशयातूनच त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद होत होते. याच रागातून सूरजने तिला धडा शिकवण्याचे ठरवले आणि अत्यंत थंड डोक्याने हत्येचा कट रचला. त्याने तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावले आणि तिथेच तिची निर्घृण हत्या केली.

१० जुलै रोजी दामूनगर परिसराच्या मागील डोंगराळ भागात एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यावर समतानगर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासणी केली असता, धारदार शस्त्राने गळा चिरून आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार करून तरुणीचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे वेगाने तपास करत अवघ्या काही तासांतच आरोपी सूरज याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.







