Temple Missing : ठाणे शहरात एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ढोकाळी परिसरातील तब्बल 50 वर्षांपूर्वी बांधलेले कुलदैवताचे एक लहानसे मंदिर अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या मंदिरातील मूर्तीपासून ते चांदीच्या पूजा साहित्यापर्यंत सर्व वस्तू नाहीशा झाल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात चर्चांना ऊत आला आहे.

ढोकाळीच्या हायलँड पार्क रोड परिसरातील हे मंदिर अनेक वर्षांपासून श्रद्धेचे केंद्र मानले जात होते. मात्र अलीकडेच गावकरी मंदिर परिसरात गेले असता तिथे मंदिराचा कोणताही ठसा उरलेला नसल्याचे त्यांना दिसले. मूर्तीसह चांदीची घंटा, आरतीचे ताट, पूजा साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू पूर्णपणे गायब झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर मंदिराशेजारी असलेली जुनी विहीरदेखील बुजवण्यात आल्याचे नागरिकांनी पाहिले. संपूर्ण जागा सपाट करून टाकण्यात आली असून मंदिर अस्तित्वाचा एकही पुरावा तिथे उरलेला नाही.
ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, हा प्रकार 20 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. नवरात्रीनिमित्त मंदिर स्वच्छ करण्यासाठी काही लोक तिथे गेले असता मंदिरच जागेवरून गायब झाल्याचे त्यांना जाणवले. ही बाब पाहून ते अवाक झाले आणि त्यांनी तातडीने इतर नागरिकांना माहिती दिली. एका रात्रीत संपूर्ण मंदिर कसे नाहीसे झाले हा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे.
या घटनेबाबत ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार मान्य करण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा संताप आणखीनच वाढला. रागावलेल्या ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या मंदिर गायब कसे झाले, यामागे नेमकी कोणाची भूमिका आहे आणि मंदिराचा अवशेषसुद्धा न उरवता जागा सपाट का करण्यात आली हे सर्व प्रश्न अनुत्तरित असून या प्रकरणाने ठाणे शहरात मोठी खळबळ उडवली आहे.






