मुंबई : मुंबई मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की, संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना आज (९ जून) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे.

पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ही घटना घडताच तातडीने घटनस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली, प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे पाच प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले.

कसा घडला अपघात?

मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही भयानक घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अशापरिस्थितीत प्रवासी दरवाजावर लटकले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवासी रेल्वे ट्रॅकवर नेमके कसे पडले याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार प्रवासी दरवाजाला लटकले असल्यामुळे बाहेर पडले असावे. असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपस सुरु असून, हा अपघात कसा घडला याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले असून, पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.







