Mumbai : मुंबईत एक अनोखी घटना समोर आली आहे. पत्नीला तिच्या रंगावर, केसांवर आणि कपड्यांच्या निवडीवरून सतत टोमणे मारणं एका पतीला चांगलच महागात पडलं आहे. या प्रकाराला कौटुंबिक छळ मानत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की प्रथमदर्शनी महिलेचा छळ होत असल्याचं दिसत असून तिला दरमहा २५ हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश देण्यात आला. Mumbai

पीडित महिलेने 2005 च्या कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या कलम 23 अंतर्गत अंतरिम दिलासा मागत अर्ज केला होता. तिने 60 हजारांची मागणी केली होती, पण पतीची आर्थिक स्थिती आणि तिच्या गरजा लक्षात घेऊन न्यायालयाने 25 हजार रुपये निश्चित केले.
या दांपत्याचं लग्न 4 डिसेंबर 2016 ला झालं होतं आणि 20 ऑगस्ट 2022 रोजी दोघे वेगळे झाले. महिलेचा आरोप होता की तिला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता आणि तिच्या दिसण्यावर व कपड्यांवरून तिला सतत टोमणे मारले जात होते. पतीने मात्र स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा दावा करत पोटगीपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला. न्यायालयाने निरीक्षणात म्हटलं की पत्नी कितीही पैसे कमवत असली तरी तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी पतीचीच आहे, आणि पत्नीच्या उत्पन्नाचा पोटगीच्या हक्कावर परिणाम होत नाही. पतीने नोकरीचा राजीनामा दिला म्हणून तो जबाबदारी टाळू शकत नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे पतीला दरमहा 25 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कायम ठेवण्यात आला.







