Amit Deshmukh : लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी अहमदपूरच्या सभेत भाजप आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. “सैयारा तू तो बदला नहीं है… मौसम जरा सा रूठा हुआ है” या गाण्याचा उल्लेख करून त्यांनी महायुतीतील गोंधळावर उपरोधिक टोलाही लगावला. महायुती टिकली नाही गद्दार म्हणून सन्मान करणाऱ्यावर विश्वास ठेवू नका. त्यांची वेळी गेली आहे. असा सल्लाही अमित देशमुख यांनी अहमदपूरकरांना दिलाय.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात सुरू असलेल्या गद्दारीच्या आरोप प्रत्यारोपांवरही त्यांनी थेट भाष्य करत महायुतीतील कलह उघडपणे दाखवला. या वादामुळे अहमदपूरचे राजकारण अधिक तापलं असून, गद्दारीचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार आहे.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांनी गद्दारी केली असल्याचा आरोप भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. जिल्ह्यातील भाजप आमदार एकत्र येऊन बाबासाहेब पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, अमित देशमुख यांनी मतदारांना सावध करत सांगितलं की घड्याळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हांवरचा वाद अद्याप न्यायालयात आहे.
अशा न्यायप्रविष्ट चिन्हांवर मतदान करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचे भवितव्यच अनिश्चित आहे आणि त्यांच्या चिन्हांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, असं सांगून लोकांनी अशा पक्षांच्या भानगडीत पडू नये असा सल्ला त्यांनी दिला.







