नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली येथील महापालिका रुग्णालयात उपचारादरम्यान 19 वर्षीय गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याच रुग्णालयात उपचार घेत असलेली आणखी एक महिला गंभीर असून तिच्यावर वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनम करण डोंगरे यांना गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात पोटातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने 30 जून रोजी ऐरोली महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना एक इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्या बेशुद्ध झाल्या. पुढील उपचारासाठी त्यांना वाशी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा आणि पोटातील बाळाचा मृत्यू झाला.

मृत महिलेच्या पतीने उपचारादरम्यान दिलेल्या इंजेक्शननंतर पत्नीची प्रकृती बिघडल्याचा आरोप केला असून, या घटनेची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. दुसऱ्या एका महिलेवरही अशाच प्रकारचे उपचार झाल्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
दरम्यान, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी या घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या समितीत नवी मुंबई महापालिकेबाहेरील चार महापालिकांतील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल. चौकशीनंतर अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






