मुंबई : मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनाबाहेर सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेकडून आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडवण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे रस्त्यावर उतरले.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातही आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सीजेपीच्या समर्थनार्थ युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना भवनाबाहेर जमले होते. यावेळी पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर वातावरण तापले. पोलिसांनी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची सुटका होईपर्यंत पोलिसांची गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पोलिसांचे वाहन अडवले. या घडामोडींमुळे शिवसेना भवनाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी आमदार महेश सावंत यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. शिवसेना भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, अशी ताकीद पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी इतर नागरिकांनाही ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या भूमिकेविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत असल्याचे सावंत यांनी म्हटले. तसेच, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निषेध व्यक्त करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे दादर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.






