मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) सर्वात मोठा ‘सस्पेन्स’ आता निकालात निघण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी पडद्याआड वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गट आणि अजित पवार समर्थकांमध्ये सुरू असलेल्या बैठकांच्या सत्राने आता ‘विलीनीकरणा’चे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सोमवारी सायंकाळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात तब्बल ७० मिनिटे खलबतं झाली. पवार कुटुंबात आणि पक्षात पडलेली फूट मिटवण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड मानली जात आहे. या बैठकीनंतर लगेचच सुनेत्रा पवार आजच दिल्लीसाठी रवाना होत आहेत.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा केवळ सदिच्छा भेट नसून, तो राष्ट्रवादीच्या भविष्यासाठी अत्यंत कळीचा आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही नुकताच झालेला दिल्ली दौरा या घडामोडींशी जोडला जात आहे.

एकीकडे राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा कठीण समयी पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणे, हे महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सत्ता समीकरणे बदलणारे नसून एक मोठे भावनिक वळणही ठरणार आहे.







