Pune Crime : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील मोशी परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला अडवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. भर वर्दळीच्या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी एका युवकाला धमकावत त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. या प्रकरणी एमआयडीसी (MIDC) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिपीन नंदलाल चौधरी (वय 28, रा. मोशी) हे रविवारी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता संतनगर चौक ते जय गणेश साम्राज्य चौक या मार्गावरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना अचानक अडवले. काही कळण्याच्या आतच आरोपींनी चौधरी यांना धमकावत त्यांच्या खिशातील 8000 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तेथून पळ काढला.
घटनेनंतर बिपीन चौधरी यांनी तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान मनोज काळुराम गायकवाड (वय 34, रा. ताडीवाला रोड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचीही चौकशी सुरू आहे. वर्दळीच्या भागात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.







