Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 19 नोव्हेंबरला गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी भाजपकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन लोटस’ तसेच काही तक्रारींबाबत शाहांसमोर सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. (Eknath Shinde Meets Amit Shah)

समोर आलेल्या माहितनुसार, शिंदे यांनी शहांकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांच्याबाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. कल्याण–डोंबिवलीसह राज्यातील काही भागांत भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवून शिंदे गटातील माजी नगरसेवकांना भाजपच्या गळाला लावले होते. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. शिंदे यांनी ही बाब शाहांना स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Pune Politics: शरद पवारांच्या शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला; शहरात तणाव, नेमकं काय घडलं?
काय म्हणाले Chandrashekhar Bawankule?
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत नाराजीच्या बातम्यांना फेटाळून लावले. त्यांनी माध्यमांना सांगितले, “मी परवा एकनाथ शिंदेंना भेटलो, ते अजिबात नाराज नव्हते. काल झालेली अमित शाह यांच्याशी बैठक ही नगरविकास विभाग आणि केंद्राशी समन्वयाच्या मुद्द्यांवर होती. एनडीएमध्ये विशिष्ट कालावधीनंतर नेत्यांमध्ये चर्चा होणं ही सामान्य गोष्ट आहे. नाराजीच्या बातम्या पूर्णपणे आधारहीन आहेत.” असे ते म्हणाले.
बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केले की, समन्वय समितीनेच “एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नये” असा निर्णय घेतला आहे. तथापि, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतर्गत पक्षांतर सर्वत्र होत असल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्याच मतदारसंघातून भाजपचे काही पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत. या सामान्य, स्वाभाविक बाबी आहेत. महायुतीत कुठेही विसंवाद नाही,” असेही बावनकुळे म्हणाले.







