मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता विधानसभेपर्यंत धडक दिली असून, या प्रकरणातील धक्कादायक तपशील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis On Ashok Kharat) यांनी सभागृहात मांडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. (Ashok Kharat Case) महिलांच्या शोषणासाठी अंधश्रद्धा, भीती आणि तथाकथित ‘दैवी शक्ती’चा वापर कसा केला गेला, याचे थरकाप उडवणारे तपशील त्यांनी उघड केले. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात महिलांना संमोहन करून ‘विधी’च्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार करत असे. महिलांच्या शरीरावर हात फिरवणे, त्यांच्या खासगी अवयवांशी छेडछाड करणे, तसेच ‘शुद्धीकरण’ किंवा ‘तीर्थ’ म्हणून अमानवीय कृत्ये करण्यास भाग पाडणे, असे प्रकार या प्रकरणात समोर आले आहेत. इतकेच नव्हे, तर स्वतःला दैवी अवतार असल्याचे सांगत “हे कुणाला सांगितल्यास दैवी कोप होईल” अशी भीती दाखवून पीडित महिलांना गप्प ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तो धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट टाकायचा आणि त्यांना स्वतःची लघवी पाजायचा असा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या प्रकरणात केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर ब्लॅकमेलिंगचाही मोठा पैलू समोर आला आहे. एका महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एआयच्या माध्यमातून बनावट अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्याचा प्रयत्न झाल्याची बाबही तपासात पुढे आली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पुरावे जप्त केले आहेत. 6 लाखांहून अधिक रोख रक्कम, 2 लॅपटॉप, डीव्हीआर, रिव्हॉल्वर आणि जिवंत तसेच वापरलेली काडतुसे पोलिसांच्या हाती लागली आहेत. 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात आतापर्यंत 8 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
याशिवाय, अशोक खरातची आर्थिक बाजूही उघड होत आहे. त्याच्या नावावर आणि नातेवाईकांच्या नावावर असलेल्या 33 एकर जमीन, फार्महाऊस, पनवेलमधील 40 गुंठे जमीन, पुण्यातील फ्लॅट आणि सिन्नरमधील मंगल कार्यालय अशा सुमारे 40 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा तपास सुरू आहे. संबंधित संस्थान, पुजारी आणि सहकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवत त्यांचे समुपदेशन केले जात असून, आणखी महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
या प्रकरणाने अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाचा भयानक चेहरा उघड केला असून, समाजात जागरूकतेची आणि कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे.







