पुणे, ता. 24 : हडपसर–उरुळी कांचन मार्गावरील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ लहूजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर हलगी-नाद आणि बोंबाबोंब आंदोलन करत आज मंगळवारी (ता.24) प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी घालणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वाहतूक अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी विजय सकट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2025 रोजी उरुळी कांचन परिसरात रिक्षा चालकांकडून प्रवाशांशी गैरवर्तन तसेच एका रिक्षामध्ये 9 ते 10 प्रवाशांना कोंबून अवैध प्रवासी वाहतूक केल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत 15 जुलै 2025 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात लेखी अर्जही सादर करण्यात आला होता.
तक्रारीनंतरही ठोस कारवाई झाली की नाही, याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्यान्वये मागविलेल्या माहितीत 29 मे ते 5 जून 2025 या कालावधीत हडपसर ते उरुळी कांचन मार्गावर कोणतीही दंडात्मक कारवाई झाल्याचा अभिलेख उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले, असा दावा संघटनेने केला आहे.
या प्रकरणात हडपसर वाहतूक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे आणि लोणी काळभोर वाहतूक विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौकशी अहवालातही संबंधित अधिकाऱ्यांची बाजू मांडून त्यांना पाठीशी घातल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ पुरावे, सोशल मीडियावरील बातम्या आणि वारंवार दिलेली निवेदने असूनही गेल्या नऊ महिन्यांत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत व्यक्त करत लहूजी शक्ती सेनेने अखेर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी
संघटनेने पोलीस आयुक्तांकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.







