Crime News: मुंबई : मुंबईजवळील नालासोपारा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अश्लील टिप्पणी केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या (Murder) करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, आफताब शेख (वय 24) हा आपल्या पत्नी शबाना शेख (वय 22) हिच्यासोबत प्रगती नगर भागात राहत होता. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने शबानाने व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहिल्यानंतर मेहंदी हसन शेख (वय 22) याने त्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याने इन्स्टाग्रामवरही शबानाला अपमानास्पद संदेश पाठवले.
पत्नीबाबत झालेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या आफताबने शुक्रवारी सकाळी शबानासह नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर येथे मेहंदीच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीत बदलला. त्याच दरम्यान मेहंदीने धारदार चाकूने आफताबवर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या आफताबचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मृत आणि आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





