मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताच्या भीषण घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर न आल्याने राजकीय वर्तुळात संशयाचे धुके गडद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, हा केवळ अपघात नसून ‘घातपात’ असण्याची शक्यता वर्तवली आहे.

विमान अपघाताच्या तपासात ‘ब्लॅक बॉक्स’ हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. रोहित पवार यांच्या मते, ब्लॅक बॉक्स तांत्रिकदृष्ट्या कधीही बंद ठेवता येत नाही आणि तो सहजासहजी जळून नष्ट होत नाही. मात्र, सध्या “ब्लॅक बॉक्स बंद होता” किंवा “तो खराब झाला आहे,” अशा अफवा समोर येत आहेत. तपासातील हा विलंब आणि विसंगत माहिती संशयास्पद असून, पुरावे नष्ट करण्यासाठी विशिष्ट कंपनीला वेळ दिला जातोय का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
सामान्यतः विमान अपघातानंतर 10 ते 15 दिवसांत नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) आपला प्राथमिक अहवाल सादर करते. मात्र, 20 दिवस होऊनही अधिकृत माहिती बाहेर न येणे धक्कादायक आहे. ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी परदेशात पाठवल्याच्या चर्चा आताच का सुरू झाल्या, यावरही पवारांनी बोट ठेवले आहे.







