मुंबई: खरात प्रकरणावरून राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु असताना, एका धक्कादायक दाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अघोरी विद्या करण्यासाठी स्वतःच्या हाताचे बोट कापले, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, चाकणकर यांनी यावर उत्तर दिले आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरून रुपाली चाकणकर यांनी 2 सप्टेंबर 2024 च्या सोमवती अमावस्येला आपल्या हाताचे अनामिका हे बोट कापून विधी केला, असा दावा अंधारे यांनी काही फोटोंचा आधार घेत केला. तंत्र-मंत्र शास्त्रानुसार, अनामिका हे बोट सूर्य आणि शुक्राशी संबंधित असून अघोरी कृत्यासाठी महत्वाचे मानले जाते. विशिष्ट मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी किंवा कुणाला प्रभावित करण्यासाठी या बोटाचा वापर अघोरी विद्येत केला जातो, असे स्पष्टीकरण अंधारे यांनी दिले.
या आरोपांनंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व दावे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, अंधारे यांनी दाखवलेला फोटो 12 सप्टेंबरचा असून त्यातील ‘1’ हा आकडा खोडून तो 2 सप्टेंबरचा भासवण्यात आला. “2 सप्टेंबरला मी अजित पवारांच्या दौऱ्यात होते, तेव्हा माझ्या हाताला कोणतीही जखम नव्हती. 5 सप्टेंबरपर्यंतच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांचे फोटो माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध आहेत, त्यात हात पूर्णपणे बरा आहे,” असे त्यांनी पुराव्यासह सांगितले. बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.







