मुंबई: मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात एका धक्कादायक चोरीच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. 19 वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी प्रियकर-प्रेयसीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, एका 65 वर्षीय महिलेने 4 मे रोजी पुण्याला जाण्यापूर्वी घरातील सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू कपाटातील लॉकरमध्ये ठेवून दिल्या होत्या. 14 मे रोजी कुटुंब परत आल्यानंतर कपाटाचे लॉकर तुटलेले आणि दागिने गायब असल्याचे लक्षात आले. घरात जबरदस्तीने प्रवेश झाल्याच्या खुणा नसल्याने संशय घरातील व्यक्तींवर गेला.
चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी 19 वर्षीय नातीवर संशय व्यक्त केला. विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली. सुरुवातीला दागिने परत करण्याचे आश्वासन दिल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली नव्हती.
मात्र, 17 मे रोजी तरुणीने प्रियकरासोबत घर सोडले आणि चोरीचे दागिने घेऊन फरार झाली. तिचा मोबाईलही बंद झाल्याने कुटुंबीयांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवत पोलिसांनी 18 मे रोजी या दोघांना अटक केली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियकराला अमली पदार्थांचे व्यसन असल्याने पैशांची गरज होती. तसेच चोरीतील दागिने विकून लग्न करून नवीन आयुष्य सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. या हेतूने दोघांनी मिळून चोरीचा कट रचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







