मुंबई: मंत्रालयाच्या छताखाली बसून सरकारी निधीच्या वाटपासाठी ‘टक्केवारी’ मागणाऱ्या भ्रष्ट साखळीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनातील ‘क्लीनअप’ मोहीम तीव्र केली असतानाच, अर्थ व नियोजन विभागाचा कक्ष अधिकारी विलास लाड यांना 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खारघरमधून अटक करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागांतर्गत येणारा हक्काचा निधी मंजूर करून देण्यासाठी लाड याने तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. सरकारी कामात अडवणूक करून स्वतःचे खिसे भरणे लाड याच्या अंगाशी आले. तक्रारदाराने न डगमगता ‘एसीबी’कडे धाव घेतली आणि सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री नवी मुंबईतील खारघर परिसरात ही रक्कम स्वीकारली जात असतानाच पथकाने लाडला रंगेहात पकडले.
मंत्रालयातून भ्रष्टाचार हद्दपार करण्याचा इशारा दिल्यानंतरही काही अधिकारी अजूनही भ्रष्टाचार करत आहेत. काही दिवसांपूर्वीच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना मंत्रालयातूनच अटक झाली होती. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई प्रशासनातील सडक्या यंत्रणेवर थेट प्रहार मानली जात आहे.







