पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवार, १२ जुलै रोजी यवत येथे मुक्कामासाठी येत आहे. या पार्श्वभूमीवर, यवत गावाला आणि उत्तर भागातील गावांना जोडणाऱ्या मुख्य यवत स्टेशन रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, प्रशासनाने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

हा रस्ता यवत गावापासून रेल्वे स्टेशनपर्यंत सुमारे २ किलोमीटर अंतराचा आहे. सध्या या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. पालखी मुक्कामादरम्यान शिरूर आणि दौंड तालुक्यातील उत्तर भागातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. तसेच पालखी सोहळ्यातील अनेक दिंड्याही याच मार्गाचा वापर करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघातांची शक्यता वर्तवली जात आहे.

हा रस्ता केवळ यवतपुरताच मर्यादित नसून राहू, खामगाव, उंडवडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे आणि शिरूर तालुक्याला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. दररोज शेकडो नागरिक, शेतकरी आणि रुग्ण या मार्गावरून प्रवास करतात.रेल्वे पकडण्याच्या घाईत असणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना या खड्ड्यांमुळे वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.दुचाकी चालवताना अचानक समोर येणाऱ्या खड्ड्यांमुळे रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.

या समस्येबाबत ‘पीएमआरडीए’ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, पालखी सोहळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता प्रशासन प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







