मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेला मोठा धक्का देणारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चर्चगेट ते विरार लोकल प्रवासादरम्यान महिलांचे गुपचूप व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साबीर मोहम्मद रुस्तम असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे चोरून टिपलेले फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. हा तरुण चालत्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे न कळवता व्हिडिओ शूट करायचा.
विशेष म्हणजे, हे व्हिडिओ आणि फोटो नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मॉर्फ केले जात होते. त्या महिलांचे चेहरे वापरून अश्लील रील्स तयार केल्या जात असत. सोशल मीडियावर जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी या आक्षेपार्ह रील्स इंस्टाग्रामवर अपलोड केल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.

या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो प्रवासी रोज या लोकलने प्रवास करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड आणि डिजिटल स्वरूपात होणारा हा हरासमेंट अत्यंत चिंताजनक आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू केली असून, या घटनेने मुंबईच्या लोकल प्रवासात खळबळ उडाली आहे.







