डॉ. अशोक बालगुडे

मुंबई : नामांतराची घोषणा झाली; चर्चांना उधाण आले आणि आक्षेपांचे सूरही उमटले! मात्र, रेल्वे स्थानकाचे नामांतर होणार की मेट्रो स्थानकाचे, यावरून निर्माण झालेला संभ्रम अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूर केला. दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाणार नसून, दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नामकरणासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीशी जोडलेल्या चैत्यभूमीला स्वतंत्र ओळख मिळावी, यासाठी नामकरणाची मागणी पुढे आली होती. राज्य सरकारने दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार विधिमंडळ समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करून नामकरणाची पुढील कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या संभाव्य नामांतराला आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानक यांच्या नामकरणाबाबतचा संभ्रम अधिकच वाढला होता. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे रेल्वे स्थानकाचे नाव कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापरिनिर्वाण दिनासाठी प्रशासनाला निर्देश
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. त्यांच्या सोयीसाठी सुविधा, सुरक्षा, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून अनुयायांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानकाच्या नावाला चैत्यभूमीची ओळख मिळणे हा प्रतीकात्मक सन्मान असला, तरी बाबासाहेबांच्या समतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार सार्वजनिक जीवनात रुजवणे, हेच त्यांच्या स्मृतीला खरे अभिवादन ठरेल.







