Samruddhi Mahamarg Accident: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भावाचा मृतदेह घेऊन निघालेल्या एका कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळले आहे. आधी भावाचा मृत्यू आणि त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जात असतानाच बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या यादव कुटुंबातील लालजी यादव वय 65 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून कुटुंबातील काही सदस्य समृद्धी महामार्गाने प्रवास करत होते. या रुग्णवाहिकेत मृताच्या बहिणी सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव वय 49 आणि त्यांचे पती भगवती प्रसाद यादव हेही होते.
हेही वाचा- नियतीचा खेळ! झाडाने वाचवला 22 महिलांचा जीव, मृत्यू समोर दिसला पण वेळ आली नव्हती; नेमकं काय घडलं
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील जांबरगाव शिवारात हा अपघात झाला. रात्रीच्या वेळीस रुग्णवाहिका भरधाव वेगात जात होती. अचानक समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. या भीषण धडकेत रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले. अपघात इतका गंभीर होता की सावित्रीदेवी यादव यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात त्यांचे पती भगवती प्रसाद यादव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिकेत असलेल्या इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.
या प्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुग्णवाहिका चालकाविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात नेमका कसा झाला, वेग किती होता आणि चालकाची चूक होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






