राजगुरुनगर, ता. 15: पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे खाजगी क्लासमध्ये शिकवणी सुरू असतानाच एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करत त्याचा गळा चिरल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. (pune crime news)

प्रत्यक्ष क्लासरूममध्येच हा रक्तरंजित हल्ला झाल्याने एकच गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तर हल्लेखोर विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जखमी व हल्ला केलेल्या दोघांचेही अद्याप नाव समजू शकले नाही.
या घटनेमुळे राजगुरूनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, खाजगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “क्लासरूममध्येच लहान मुलांकडून चाकूहल्ला होणे म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारचे गँगवारसदृश प्रकार वाढत असतील, तर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पालकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण असून, लहान वयातच मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. खाजगी क्लास चालकांची जबाबदारी, सुरक्षेची व्यवस्था आणि पोलीस प्रशासनाची भूमिका यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात







