पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 3 ते 4 दिवसांत पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शनिवारी (12 सप्टेंबर) पुण्यात दिवसभर कडक ऊन पडले होते. मात्र, सायंकाळच्या वेळी अचानक ढग जमा झाल्याने वातावरणात प्रचंड आद्रता आणि उकाडा वाढला. या दिवशी शहरात कमाल तापमान 30°C आणि किमान तापमान 21.1°C नोंदवले गेले. रविवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान असून, दुपारी आणि सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवस अशीच स्थिती राहणार असल्याने बाहेर पडताना वाहनधारकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 13 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहील. प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास, पुणे घाटमाथा, सातारा आणि सातारा घाट परिसर या भागांसाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी कोणताही थेट अलर्ट जारी केलेला नसला, तरी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






