Pune News : जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर अवघ्या २३ वर्षांच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गडाचीवाडी (खोडद) येथील समृद्धी अजित वामन हिने भारतीय वायुदलात ‘फ्लाइंग ऑफिसर’ (एरोनॉटिकल इंजिनिअरिंग) या मानाच्या पदावर निवड मिळवून कुटुंबासह गावाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.

किल्ले नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका लहान गावातून आलेल्या समृद्धीने हे मोठे यश संपादन केले आहे. तिचे वडील अजित वामन हे एलआयसीमध्ये विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत, तर तिची आई अरुणा वामन मुंबई पोलीस दलात सेवा देत आहेत. पोलीस दलातील आईच्या शिस्त आणि समर्पणाचा वारसा समृद्धीने आपल्या वाटचालीस जपला आहे.
सध्या टाटा पॉवरमध्ये प्रमुख अभियंता म्हणून उच्च पदावर कार्यरत असतानाही समृद्धीने आपल्या देशाच्या सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय वायुदलासाठीची तयारी सातत्याने सुरू ठेवली होती. तिचे हे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक मोठी प्रेरणादायी घटना आहे. समृद्धीच्या या गगनभेदी यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.







