पुणे: पुणे (Pune News) येथील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी ‘अलकनंदा’ या नावाने ओळखली जाणारी एक अत्यंत जुनी वळणदार दीर्घिका शोधून काढली आहे. ही दीर्घिका इतकी दूर आहे की तिचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तब्बल 12 अब्ज वर्षांहून अधिक काळ लागतो, ज्यामुळे ती आजपर्यंत ज्ञात झालेल्या सर्वात प्राचीन दीर्घिकांपैकी एक ठरली आहे. विश्वनिर्मितीच्या सिद्धांतांमध्ये मोठे बदल घडवून आणणारा एक नवीन शोध लावला आहे. ही दीर्घिका बिग बँग् नंतर अवघ्या दीड अब्ज वर्षांनी तयार झाली आहे.

पीएच.डी. विद्यार्थीनी राशी जैन यांनी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोध लावला. हे संशोधन नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या डेटावर आधारित आहे. सुरुवातीच्या काळात दीर्घिका अविकसित आणि अस्तव्यस्त होत्या, असा जुना समज होता. मात्र, अलकनंदासारखी परिपूर्ण वळणदार रचना इतक्या कमी वेळेत तयार झाल्याचे पाहून तज्ज्ञांना दीर्घिका उत्क्रांतीच्या समजुतीवर पुनर्विचार करणे भाग पडले आहे.
‘अलकनंदा’ दीर्घिकेचा कोनीय आकार इतका लहान आहे की, ती दूरवरून पाहिले असता, तीन किलोमीटर अंतरावर ठेवलेल्या एक रुपयाच्या नाण्याइतकी छोटी दिसते. रचनेच्या बाबतीत ‘अलकनंदा’ आपल्या ‘मंदाकिनी’ आकाशगंगेशी साम्य दर्शवते. ही दीर्घिका देखील वळणदार आहे. तिच्या रचनेत मध्यभागी एक फुगलेला भाग आणि बाहेरच्या बाजूला दोन भुजा स्पष्टपणे दिसतात. या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांची निर्मिती अतिशय जलद गतीने होत आहे.
संशोधकांच्या मते, दरवर्षी अंदाजे 63 सूर्यांइतक्या वस्तुमानाचे तारे येथे तयार होत आहेत, जे प्रमाण आपल्या आकाशगंगेतील निर्मितीपेक्षा 20 ते 30 पट अधिक आहे. या शोधामुळे सुरुवातीचे विश्व अपेक्षेपेक्षा अधिक प्रगल्भ आणि झपाट्याने विकसित होत होते, हे स्पष्टपणे सिद्ध झाल्याचे प्रा. वाडदेकर यांनी नमूद केले.







