पुणे: पुणे (Pune News)शहरात अनेक ठिकाणी खासगी बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने होणारी वाहतूक कोंडी आता कमी होण्याची शक्यता आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून बाहेरून पुण्यात येणाऱ्या आणि पुण्यातून बाहेर पडणाऱ्या सर्व लक्झरी ट्रॅव्हल्स आणि बसेससाठी नियम बदलले आहेत.

पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी नुकतीच लक्झरी ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत वाहतुकीला होणारा अडथळा आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बसेससाठी वेळेचे बंधन:
शहरात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या खासगी बसेसना सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ठरवून दिलेल्या मार्गांवरूनच प्रवेश दिला जाईल. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गावर या बसेसना प्रवेश सक्त मनाई आहे. पुणे शहरातील कोणत्याही बस थांब्यावर खासगी बसला 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबता येणार नाही. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल.
वाहतूक पोलिसांनी या नियमांमुळे कोणाची गैरसोय होत असल्यास, 15 दिवसांच्या आत आपल्या हरकती पोलिसांकडे नोंदवण्याचे आवाहन केले आहे.






