Pune Crime: पुणे: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सुनेचा छळ काही कमी होईना. अशातच पुन्हा एका प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली आहे. तब्बल 17 वर्षे उलटूनही एका विवाहितेवर सासरकडून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सुरू आहे. या सर्वांना कंटाळून पीडित महिलेने अखेर विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न 2008 मध्ये विजय तुपे यांच्यासोबत झाले. मात्र लग्नानंतर काहीच दिवसात ‘हुंडा कमी दिला’ या कारणावरून तिच्यावरील त्रास सुरू झाला. वारंवार शिवीगाळ, अपमान, मारहाण आणि पैशांची मागणी अशा प्रकारांना ती सामोरी जात होती.
इतकंच नाही तर विवाहितेच्या वडिलांनी तिच्या नावावर घेतलेला हडपसर येथील फ्लॅट जबरदस्तीने विकावा लागला. या विक्रीतून मिळालेले 7 लाख 67 हजार 883 रुपये पती आणि सासूच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास तिच्यावर दबाव टाकण्यात आला, असा गंभीर आरोप तिने तक्रारीत केला आहे.
पीडितेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, पती विजय तुपे तीला नेहमीच शिवीगाळ, मारहाण आणि धमकी देत होता. एवढेच नाही, मुलांसमोरही अश्लील बोलणे आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. या छळात दीर कौस्तुभ तुपे याचाही सहभाग असल्याचे नमूद झाले आहे. 2016 साली त्याने लोखंडी पाईपने मारहाण केली, तसेच पुन्हा तक्रार केल्यास जीव घेण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्वांना कंटाळून पिडीत महिलेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







