पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील करंदी खेबा गावाला जोडणाऱ्या सुमारे तीन किलोमीटरच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत असून अनेकदा दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

या मार्गावरून दररोज ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्त्याची चाळण झाल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. स्थानिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

करंदी खेबा गावाच्या रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने भरून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.







