धाराशिव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने फिल्मी स्टाईलने एका पोलीस खात्यातील अधिकाऱ्याला पकडले आहे.

धाराशिवमधील ही घटना आहे. एका महिलेने आपल्या मुलाविरुद्ध दाखल आत्महत्या प्रकरणात मदत व्हावी, यासाठी पाेलिस निरीक्षक माराेती शेळके याच्याशी संपर्क केला हाेता. शेळके यांनी महिला पाेलिस कर्मचारी मुक्ता प्रकाश लाेखंडे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यावर महिलेने लाेखंडे यांची भेट घेतली असता, त्यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजाेडीअंती ९५ हजार रूपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर तक्रारीची पडताळणी केली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावत शेळकेसह महीला अमलदार यांना रंगेहात पकडले. यानंतर शेळके तसेच कर्मचारी लाेखंडे या आराेपींना अटक करण्यात आली.
पुढील कारवाईसाठी पोलिस निरीक्षक मारोती शेळके यांना लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असता. शेळके यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांची नजर चुकवून शेळके कार्यालयातून बाहेर पळत सुटले. अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी छञपती संभाजी महाराज चौक,आर.पी कॉलेज रोड पर्यंत पाठलाग केला. आणि शेळके यांना लेडीज क्लब जवळ पकडले. अधिकाऱ्यांनी शेळके यांना ज्या प्रक्रारे पकडले त्याचा व्हिडिओ सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढले असून, त्यांच्यावर मोठ्या प्राणात कारवाई करण्यात येत आहे. लाचखोरीच्या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांना पदावरून देखील मुक्त करण्यात आले आहे.







