उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामर्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका 46 वर्षीय इसमाला भरधाव बुलेटने जोरदार दिलेल्या धडकेत परप्रांतीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. 06) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सोरातापवाडी हद्दीरील एलाईटच्या मोकळ्या जागेसमोर ही घटना घडली.

शिवदयाल उर्फ शिवचरण पुरण केवट (वय -46, रा. खोड, शिवपुरी राज्य मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत दिलीप अर्जुन शितोळे, (वय 47, व्यवसाय नर्सरी, रा. कोरेगाव मुळ, इनामदार वस्ती, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार करण सोमनाथ कसबे, (रा.लोणी काळभोर ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक करण कसबे हा आपल्या ‘एमएच झेडटी 5583’ (MH ZT 5583) क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे चालला होता. सोरतापवाडी येथील एलाईट ग्राउंडसमोर रस्ता ओलांडणाऱ्या शिवदयाल केवट यांना दुचाकी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, अत्यंत हयगयीने आणि भरधाव वेगात गाडी चालवून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत शिवदयाल केवट यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालक करण कसबे हा देखील स्वतःच्या अविचाराने चालवलेल्या गाडीमुळे जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी दिलीप शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपी दुचाकी चालक करण सोमनाथ कसबे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी चालक करण कसबे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मत्रे करीत आहेत.






